राज्यातील ४२ तालुक्यांना अल निनोच्या प्रभावाचा फटका !

Maharashtra News : यंदा राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे ४२ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत,

या तालुक्यांचे अंतिम सर्व्हेक्षण होणार आहे. स्थानिक प्रशासनाने महामदत मोबाइलच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सर्व तालुक्यांतील स्थितीचा अहवाल ऑक्टोबर अखेरपर्यंत दुष्काळ देखरेख समितीमार्फत राज्य शासनाला सादर करावा,

अशा सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाने दिल्या आहेत. राज्यात एक जून ते २६ ऑगस्ट या काळात सरासरी ७७२.४ मि.मी. पाऊस पडतो.

मात्र, यंदा प्रत्यक्षात ७०९.५ मि.मी. म्हणजे सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के कमी असून, मराठवाड्यात १८ टक्के तर विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्याच्या महसूल विभागामार्फत दुष्काळाचे महामदत मोबाइल अॅपद्वारे सर्वेक्षण केले आहे.

त्यामध्ये राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुके दुष्काळाच्या निकषात बसत आहेत. त्यामुळे आता दुष्काळाची स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे किंवा कसे,

असल्यास दुष्काळाची तीव्रता किती आहे, तो कोणत्या प्रकारात मोडतो, याचा अहवाल ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीमार्फत शासनाला सादर करा, असे आदेश स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत