सरकारला ४८ तासांची मुदत ! मनोज जरांगे-पाटील २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणार ! राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

Maharashtra News : सरकारने कायद्यात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे,

या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आरक्षण लढ्यातील योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील आंदोलनाची भूमिका आणि दिशा स्पष्ट केली.

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांचा (४८ तास) वेळ आहे. या दोन दिवसांत आरक्षण मिळाले नाही तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहोत.

या उपोषणात अन्न पाणी, वैद्यकीय सेवा, उपचार असे काहीही घेणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासून राज्यभरात गावागावांत साखळी उपोषण सुरू केले जाणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन • सुरू आहे.

२९ ऑगस्ट रोजी शहागड येथे आक्रोश मोर्चा काढल्यानंतर त्यांनी याच दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते.

असे असतील आंदोलनाचे चार टप्पे
■ २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण. अन्न, पाणी, वैद्यकीय सेवा घेणार नाही.
■ गावांमध्ये कायद्याच्या पदावरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला गावात येऊ दिले जाणार नाही, आला तर ढकलून गावाबाहेर रवाना केले जाईल.
■ २८ ऑक्टोबरपासून प्रत्येक सर्कलमध्ये ग्रामस्थ साखळी उपोषण करणार, सर्व गावांनी एकत्र येत एकाच ठिकाणी उपोषण करायचे आहे.
■प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात समाजबांधवांनी एकत्र येऊन कँडल मार्च काढायचा आहे.