7th Pay Commission : नवरात्र उत्सवाचा काळ केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर राहिला आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्र उत्सवात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
सदर निर्णयानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून चार टक्के एवढा वाढवण्यात आला आहे. यानुसार, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. आधी हा महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता.
विशेष म्हणजे DA मध्ये झालेल्या या वाढीचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. याचाच अर्थ जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे.
यामुळे सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात मोठा पैसा पडणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA वाढीचा हा निर्णय झाल्यानंतर रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील चार टक्के वाढविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून 46 टक्के एवढा होणार आहे. यामुळे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ दिली जावी याबाबत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. विश्वास काटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत एक पत्र देखील सादर करण्यात आले आहे. या पत्रात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री विश्वास काटकर यांनी दिवाळी सणाचा हंगाम पाहता राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरात लवकर वाढवला जावा अशी मागणी केली आहे.
खरंतर, पुढील महिन्यात 12 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. दिवाळी सणाला कर्मचाऱ्यांना साहजिकच पैशांची निकड राहणार आहे. यामुळे सणासुदीचा काळ पाहता राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागणीबाबत काय निर्णय घेतात आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढवला जातो ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.