Pune News : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) माध्यमातून घेण्यात येतो.
त्यानुसार सर्व खाजदार आणि आमदार यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शविणे आवश्यक आहे. दिशा समितीची बैठक मंगळवारी (दि.१७) पार पडली असून या बैठकीला एकही खासदार उपस्थित नसून केवळ तीन आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेला उधाण आले असून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने दिशा समितीची बैठक महत्त्वाची असते.
जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर मंगळवारी प्रथमच दिशा समितीची बैठक केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
विशेष म्हणजे या बैठकीत केवळ तीन आमदार उपस्थित असून उर्वरित १८ आमदार आणि खासदारांच्या गैरहजेरीत ही बैठक पार पडली.
केवळ भाजपचे आमदार भीमराव तापकीर, काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर हे तीनच आमदार उपस्थित होते.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना, विमानतळ, अमृत योजना, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असणारे कामे, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान,
जलजीवन मिशन, बेची। बचाव बेटी पढाव, कौशल्य विकास योजना तसेच पायाभूत सुविधा, कृषी,
आर्थिक विकासात्मक धोरणे, विविध लाभदायी योजना अशा तब्बल ४५ विषयांतील कामकाजांचा आढावा घेण्यात आला.
यातील सर्वाधिक कामे खासदारांच्या अखत्यारित येत असताना या बैठकीत एकही खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
हेतुपुरस्सर बैठकीला दांडी
शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांनी प्रवेश केल्याने तीनही पक्षांचे लोकप्रतिनिधी संभ्रमावस्थेत आहेत.
तसेच, अजित पवार गट वेगळा झाल्याने विरोधी पक्षातील खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे तर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे तिघे अनुपस्थित राहिले.
तर इतर राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार दौऱ्यावर आहेत.
मात्र, पुणे- मुंबईत असणाऱ्या आमदारांनी हेतुपुरस्सर बैठकीला दांडी मारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.