वाळू विक्री धोरणानुसार पुणे जिल्हा दुसऱ्या स्थानावर

Pune News : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने नवीन वाळू धोरणाला मे महिन्यात संमती दिली.

त्यानंतर महाराष्ट्रात नवीन वाळू धोरण लागू करण्यात आले. त्यानुसार राज्यात अवघ्या सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू देण्यास सुरुवात झाली आहे.

वाळू डेपो विक्रीत नागपूर जिल्हा प्रथम स्थानावर असून, पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पुणे जिल्ह्यात १५ वाळू डेपोंचे लिलाव झाले आहेत. त्यापैकी सात डेपोवरून प्रत्यक्षात वाळू विक्रीला सुरुवात झाली आहे.

चार डेपो वेळेत सुरू केले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर उर्वरित चार डेपोवर तांत्रिक तपासण्या करून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा खनीकर्म विभागाचे अधिकारी सुयोग जगताप यांनी दिली.

त्यानुसार पहिल्या टप्यात चार, दुसऱ्या टप्प्यात सहा तिसऱ्या टप्प्यात चार आणि चौथ्या टप्प्यात अशा १५ वाळू डेपोचे लिलाव करण्यात आले.

यामध्ये बारामती तालुक्यात मुरमाचा डेपो तयार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यात कानगाव आणि नानवीज, पुरंदर तालुक्यात पांडेश्वर,

शिरूर तालुक्यात चिंचणी आणि निमोणी अशा सात ठिकाणचे वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत.

तर इतर तालुक्यातील चार डेपोंचे लिलाव झाले असताना निविदा भरणाऱ्यांनी अद्याप ते सुरू केलेले नाही, त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

आठवडेभराच्या मुदतीत वाळू डेपो सुरू केले नाही, तर संबंधितांची निविदा रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील चार ठिकाणचे वाळू डेपो सुरू झालेले नसून, यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर स्थानिकांकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्थानिक पातळीवरील मतभेद, वाद-विवाद आणि इतर कारणांमुळे इतर वाळू डेपोंना सुरुवात झालेली नाही.

परंतु, लवकच लिलाव होऊनही अद्याप सुरू न झालेले डेपो त्वरित सुरू करण्याचे आदेश गौण खनीज विभागाला देण्यात आले आहेत. नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार वाळू मिळेल. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे