Ajit Pawar News : अजित पवार यांची अवस्था ‘आयाळ नसलेल्या सिंहा’ सारखी

Ajit Pawar News :- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, चंद्रकांत पाटील यांची अमरावती, सोलापूर येथील जबाबदारी देऊन हकालपट्टी केल्याची जोरदार चर्चा रंगली. प्रत्यक्षात मावळते पालकमंत्री पाटील हे पुण्याचे ‘सहपालकमंत्री’ म्हणून कायम राहणार आहेत.

त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या इतर समित्यांच्या निधीवाटपाबाबत सत्तेतील तीनही पक्षांचे मुख्य नेते ‘गुणसूत्र’ ठरवून नियोजन करणार आहेत. त्यामुळे नवनियुक्त पालकमंत्री अजित पवार यांची अवस्था ‘आयाळ नसलेला सिंह’ अशी करून ठेवली आहे.

राज्य शासनातर्फे बुधवारी (दि. ४) पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडली.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण तयार होत स्थानिक नेत्यांनी जल्लोष साजरा केला. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे भाजपच्या गोटात तसेच स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.

मात्र, पाटील हे पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, त्यांच्याकडे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रिपद आहे. नियमानुसार ज्या जिल्ह्यातून मंत्रिपद प्राप्त झाले आहे, त्या जिल्ह्याचे ‘सहपालकमंत्री’ म्हणून पद कायम राहते.

त्यानुसार दर दोन महिन्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा इतर समितीच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे पाटील यांनी जाहीरदेखील केले आहे. तसेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार) या तिघांचे सरकार सत्तेत असून,

पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व समित्यांना (उदा. जिल्हा नियोजन समिती, ग्राम स्वच्छता, पाणीपुरवठा आदी) देण्यात येणाऱ्या विकासनिधीच्या वाटपाबाबत ‘गुणसूत्र’ ठरवून वाटप करण्यात येणार आहे.

त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना पवार निधी पळवून नेतील अशी भीती होती, ती राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार यांनी कितीही प्रयत्न केला, तरी निधीची पळवापळवी करता येणार नसून, गुणसूत्रानुसारच निधी वाटप होणार आहे.