Pune News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यातील (रिंग रोड) पश्चिम भागातील गावांचे भूसंपादन सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मालकांना नोटीस पाठवून २१ ऑगस्टपर्यंत संमतिपत्रे देण्याचे आवाहन केले होते.
मात्र, नोटिसीची मुदत संपुष्टात आल्याने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १३ गावांमधील जमिनींचे सक्तीने भूसंपादन करण्याचे यापूर्वीच निश्चित झाले आहे. आता उर्वरित १८ गावांमधील म्हणजेच एकूण पश्चिम भागातील ३१ गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. या गावांतील ४११ हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रिंगरोडबाबत भूसंपादन अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ३१ गावांतील जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रकल्पबाधितांना नोटीस पाठविल्यानंतर सामाईक क्षेत्र असल्याने परस्पर मतभेद, वाद, तसेच मृत्यू नोंद, वारस नोंद आणि त्यांची कागदपत्रांची उपलब्धता, सातबाऱ्यावरील नाव असलेल्या व्यक्ती प्रगावी असल्याने विलंब, जागा आणि क्षेत्रफळावरून असलेले कौटुंबिक वाद, कागदोपत्री न झालेले फेरफार अशा अनेक कारणांमुळे संमतिपत्र रखडले आहेत.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत १०२१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, २०५ हेक्टर जमीन ताब्यात आली आहे, असे भूसंपादन समन्वय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी सांगितले.