भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सर्वात जुने नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे शहर भाजपला खिंडार पडले आहे.
त्यांनी मराठा आरक्षणाचे कारण पुढे करत राजीनामा दिला. परंतु, शहर भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असून एकनाथ पवारांच्या राजीनाम्यातून पक्षात गळती सुरू झाल्याचा संदेश गेला आहे.
टाटा मोटर्समधील कामगार नेते आणि नंतर भाजपमध्ये सक्रीय झालेले पवार हे १९९० पासून राजकारणात आहेत.
भाजपचे सरचिटणीस, युवा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, सत्तारुढपक्ष नेते अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली.
त्यावेळी अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकमध्ये पूर्णानगर, संभाजीनगर प्रभागातून निवडून आले होते.
त्यानंतर तीन वर्षे पक्षाचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मात्र, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांना डावलले गेले.
आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका पवारांना त्यावेळी बसला.
भोसरी विधानसभेतून संधी नसल्यामुळे पवारांनी नांदेडमधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम सुरू केले.
मात्र, तिकडे भाजपकडून त्यांना सहकार्य मिळत नाही. निष्ठावंतांना वारंवार डावलले जात असल्याची भावना त्यांची तयार झाली आहे.
त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्याने शहर भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील नेत्यांनी इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना मोठे केले.
पक्षासाठी संघर्ष करणाऱ्यांना सातत्याने मागे लोटले जात असल्यामुळे पक्षाला पवारांच्या राजीनाम्यापासून गळती सुरू झाल्याचा संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे.
■लवकरच शिवसेनेत प्रवेश ?
एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देत राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले असले तरी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही.
येत्या २७ ऑक्टोबरला ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.
कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, राजकीय जिवनात सक्रिय रहायचे की नाही, याबाबत ते २७ ते ऑक्टोबरला बोलणार आहेत.
दरम्यान, नांदेड मधील लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे.
त्यासाठी त्यांना शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.