Cotton Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या राज्यात नवीन हंगामातील कापसाची आवक होत आहे.
मात्र आवक खूपच कमी प्रमाणात आहे. पण आगामी काही दिवसात आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी विजयादशमीनंतर कापसाची आवक वाढते. यंदाही दसऱ्यानंतरच कापसाची आवक वाढणार आहे.
पण सध्या आवक कमी असताना देखील कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. खरतर, यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन उशिराने झाले.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यांना महाराष्ट्रात चक्क जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाला. परिणामी राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलैमध्ये मात्र चांगला पाऊस झाला आणि याच पावसाच्या जोरावर अनेक भागात मोसमी कापसाची लागवड करण्यात आली.
काही ठिकाणी जूनमध्ये पूर्व मौसमी कापूस लागवड करण्यात आली होती. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला म्हणून कापसाचे चांगले उत्पादन मिळणार असे सांगितले जात होते. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने खंड पाडला.
याचा कापूस पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला नसल्याने कापूस पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे उत्पादन घटले आहे तर दुसरीकडे कापसाला अपेक्षित असा भावही मिळत नाही. आता कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला असून ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे बाजारभाव दबावात आले आहेत.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. आज देखील राज्यात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. आज खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील यावलग तालुक्यात मध्यम स्टेपल कापसाला मात्र 6,350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, यावल एपीएमसीमध्ये आज मध्यम स्टेपल कापसाची 28 क्विंटल आवक झाली होती.
आजच्या या लिलावात कापसाला पाच हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 6650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 6350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला. दरम्यान भविष्यात कापसाचे बाजार भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र किती बाजार भाव वाढतील हे तर आगामी काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे.