हरभरा, मूग, मसूर आणि मटकी डाळीच्या भावांत घसरण

गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या भावांत सतत घसरण होत असल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि मटकी डाळीच्या भावांत घट झाली असून, तूर डाळीच्या भावांत मात्र बाढ झाली आहे. दरम्यान, उडीद डाळीचे भाव स्थिर आहेत.

मागणी कमी असल्याने डाळींच्या भावात सातत्याने घट होत आहे. डाळींचे दर आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे मध्यंतरी डाळी, कडधान्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती.

मात्र, प्रत्यक्षात दर वाढण्याऐवजी उतरू लागल्यामुळे आता विक्रीचा दबाव वाढला आहे.

परंतु, बाजारात उठाव एकदम कमी आहे. यामुळे बाजारात डाळी आणि कडधान्यांचे दर मंदीतच आहेत.

गेल्या १५ दिवसांमध्ये हरभरा डाळीच्या भावात क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये, मूग डाळीच्या भावात ३०० ते ४०० रुपये मटकी डाळीच्या भावात २०० ते ४०० रुपये आणि मसूर डाळीच्या भावात १०० ते २०० रुपयांची घसरण झाली आहे. तूर डाळीचे भाव १००० हजार रुपयांनी वाढले असून, उडीद डाळीचे भाव स्थिर आहेत.

दिवाळीमध्ये हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तसेच, शासनाकडून भारत ब्रॅण्ड नावाने ६० रुपये प्रतिकिलो दराने हरभरा डाळीची विक्री केली जात असल्याने देखील घाऊक बाजारात हरभरा डाळीला कमी मागणी आहे.

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात तूर डाळीची आवक ही लातूर, अकोला, मालेगाव, सोलापूर येथून होते. हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो.

मूग डाळीचा नवीन हंगाम सुरू झाला असून, राजस्थानातून सर्वाधिक आवक होते. हरभरा डाळीची आवक ही लातूर,

सोलापूर, अकोला परिसरातून होते. हरभरा डाळीचा नवीन हंगामही जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. मसूर डाळ ही मध्य प्रदेशासह काही देशांमधून आयात केली जाते.

उडीद डाळीचा नवीन हंगाम सुरू झाला असून, या डाळींची आवक ही आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतून होते.

तसेच, बर्मावरूनही आयात केली जाते. तर मटकी डाळीची आवक ही तमिळनाडूतील सेलम येथून होते. तसेच, नवीन गावरान गुजरातच्या मटकीचा हंगाम दिवाळीनंतर सुरू होतो.

■बाजारात आवकेच्या तुलनेने मागणी खूपच कमी असल्याने जवळपास सर्वच डाळींच्या भावात घसरण झाली आहे. काही डाळींचे भावात वाढ होऊन पुन्हा घट झाली आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी ही हरभरा डाळीला असते. त्यामध्येही घट झाली आहे. – अजितकुमार गुगळे, डाळींचे व्यापारी

■हरभऱ्याचा नाफेडकडे असणारा साठा शासनाने बाहेर काढला आहे. शासनाने कमी दराने विक्री सुरू केली आहे. त्यामुळे भावामध्ये घसरण झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान मागणी वाढल्यास भावांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. – नरेन आगरवाल, डाळींचे व्यापारी

■सद्यःस्थितीत नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने तुलनेने डाळींना मागणी घटली आहे. परिणामी भावातही घट झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून डाळींच्या भावात घसरण होत आहे. काही डाळींचा हंगाम सुरू झाला आहे. – विजय राठोड, डाळींचे व्यापारी

■गेल्या काही दिवसांमध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी डाळीचे भाव घटले आहेत. तर, तूर डाळीच्या भावात वाढ झाली असून, उडीद डाळीचे भाव स्थिर आहेत. आवकेच्या तुलनेत मागणी खूपच कमी असल्यामुळे भावात घसरण झाली आहे. – आशिष नहार, डाळींचे व्यापारी

घाऊक बाजारातील डाळींचे क्विंटलचे भाव

हरभरा डाळ ७२००- ७५००
तूर डाळ १३५००-१७०००
मूग डाळ १००००-१०७००
मसूर डाळ ७८००-८०००
उडीद डाळ १००००-१२५००
मटकी डाळ १०५००-११०००