पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Pune News : रब्बी हंगामाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३० हजार ३६१ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांनी दोन हजार ९३३ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन केले होते.

पुरेसा पाऊस न पडल्याने हा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. त्यातच पश्चिम पट्ट्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत.

पूर्व पट्ट्यात सप्टेंबरच्या अखेरीस पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाणीपातळी वाढली असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे.

त्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना अडचणीचा जाण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, खरीप वाया गेल्याने रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होणार असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी खरिपात झालेल्या कमी पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने जवळपास दोन लाख ४९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा दावा केला आहे. यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे.

रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी महाबीजकडून ११ हजार ५०० क्विंटल, खासगी कंपन्यांकडून १८ हजार ८६२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तालुका, गावपातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २९ हजार ३२५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यामध्ये २०२०-२१ मध्ये २६ हजार ११८ क्विंटल, २०२१-२२ मध्ये ३२ हजार ७२० क्विंटल, २०२२-२३ मध्ये २९ हजार ३२५ क्विंटलची विक्री झाली होती.

त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाण्यांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.