Pune Weather Update : पुण्यात दिवाळीत पडणार पाऊस ! पहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Pune Weather Update : ढगाळ हवामानामुळे पुणे शहरात किमान व कमाल तापमानात वाढ झाली असून, थंडीचा कडका कमी झाला आहे. गुरुवारी (दि.९) किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस इतके होते.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १०) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, रिमझिम किंवा अतिहलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहरात कमी दाबाचा पट्टा काही प्रमाणात कार्यरत झाला आहे. त्यामुळे शहरात गेले दोन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी (दि. ८) शहराच्या काही भागात पावसाच्या सरी पडल्या होत्या.

शहरात उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. मात्र, काही भागात असलेल्या ढगाळ हवामानामुळे या वाऱ्यांना अडथळा होत आहे. त्यामुळे शहरातील किमान तापमानात चढउतार होत आहे. मंगळवारी (दि. ७) किमान तापमान १६. ४, बुधवारी (दि. ८) २१.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले होते.

गुरुवारी पाषाणमध्ये किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअस इतके होते. एनडीए १८.२, हडपसर २१.७, कोरेगाव पार्क २२.५ तर वडगावशेरीमध्ये २३.१ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. बुधवारी कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस इतके होते.

त्यात गुरुवारी वाढ झाली असून, ते ३२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. येत्या १० नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, सकाळी धुकेही राहणार आहे. ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आकाश निरभ्र राहणार आहे.