पुरंदर तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी

Pune News : रविवारी (दि. १५) संपूर्ण देशात घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

राज्यात घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवार (दि. १५) पासून ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

पुरंदर तालुक्यातील १५ गावांच्या निवडणुका, तसेच पाच ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुका होणार असून,

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, कर्नलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, भोसले वाडी, वाल्हे, कोथळे, रानमळा, गुळुंचे, वीर,

माळशिरस, राजुरी, एखतपूर मुंजवडी या १५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.

त्याचप्रमाणे नायगाव, पोंढे, पानवडी सुपे खुर्द आणि राख या पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत.

१६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

दि. २३ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर, बुधवारी (दि. २५) दुपारपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे.

याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. रविवारी (दि. ५ नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल.

तर, सोमवारी (दि. ६ नोव्हेंबर) मतमोजणी करण्यात येईल, अशी माहिती पुरंदर तालुक्याचे निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद सटाले यांनी दिली आहे.