शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील पिकांवर भर !

आंबेगाव तालुक्यात चालू खरिपात कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील रब्बी हरभरा,

ज्वारी, गहू अशा पिकांवर भर देण्याची शक्यता आहे. सध्या वाढत असलेली ऑक्टोबर हिट, विहिरीत कमी असलेला पाणीसाठा आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हरभरा आणि गहू पेरणीकडे कल आहे. तालुक्यात सरासरीच्या ७६.२ टक्के पाऊस पडला आहे.

दरम्यान तालुक्यात रब्बीचे एकूण सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने सुमारे दोन हजार हेक्टरच्यावर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचा दावा केला आहे.

मान्सून हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला चांगला आधार मिळाला त्यातच कुकड़ी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या डिभे धरणात पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

यंदा आंबेगाव तालुक्यात सरासरीच्या ७६.२ टक्के पाऊस पडला आहे. आता पावसाळा संपल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या शेती कामांना सुरुवात केल्याचे चित्र शेतांमध्ये दिसत आहे.

आंबेगाव तालुक्यात काही ठिकाणी ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे तर लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात करतील.

रब्बी हंगामात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची मागणी मोठी आहे. गाव पातळीवर कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.

आमची जमीन डिंभे धरणाच्या अंतर्गत येते. त्यामुळे बऱ्यापैकी शेती बागायती आहे. यंदा कमी पावसामुळे धरणात पाणीसाठा असला तरी आवर्तन वेळेवर येईल की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत .

त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता असल्याने ठिबक सिंचनाचा अवलंब करणार आहोत याशिवाय कमी कालावधीच्या पिकांवर आणि भाजीपाला पिकांवर भर देणार आहोत. – महादेव भोर, शेतकरी, वळती.