२१ विधानसभा मतदारसंघांत वाढले सव्वा लाख मतदार

Pune News : पुणे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत यंदा एकूण १ लाख २१ हजार ७६३ ने वाढ झाली आहे.

त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ एवढी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी (दि. २७) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. आजपासून ९ डिसेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.

त्यामध्ये १ जानेवारी २०२४ पर्यंत किंवा त्याच्या आधी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तर ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील आठ मतदार संघांसह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या ७९ लाख ५१ हजार ४२० होती. ती प्रारूप यादीत ८० लाख ७३ हजार १८३ इतकी झाली आहे.

त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४२ लाख २५ हजार ९१८ एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुरुष मतदार संख्येत ५९ हजार ६५३ ने वाढ झाली आहे.

तर महिला मतदारांची संख्या ३८ लाख ४६ हजार ७४९ एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला मतदार संख्येत यंदा ६२ हजार ८१ ने वाढ झाली आहे.

पुरुष मतदार संख्येपेक्षा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक हजार पुरुषांच्या मागे ९०८ महिला होत्या. ही संख्या वाढून ९१० वर आली आहे.

तृतीय पंथी मतदारांची संख्या गतवर्षी ४९५ इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन ती ५२४ इतकी झाली आहे.

प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध देण्यात आली आहे.

नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत तेथे खात्री करता येणार आहे. तसेच, ‘एनव्हीएसपी’ आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार यादी उपलब्ध आहे.

त्यानुसार मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

युवा मतदारांची टक्केवारी वाढली
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ७९ हजार ३६२ एवढी होती. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी ०.६७ टक्के होती.

यंदा मात्र याच वयोगटातील मतदारांची संख्या ३ लाख ७१ हजार ३ एवढी झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ती ३.१३ टक्के आहे.

तर २०- २९ या वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ६३ हजार ६२४ वरून २८ लाख २७ हजार ३७६ एवढी झाली आहे.

या वयोगटातील मतदारांच्या टक्केवारी ११.५१ वरून २३.८६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यावरून युवक मतदारांच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.