Pune News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलले

पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण गेल्या आठवड्यापासून राज्यभर गाजत आहे.

या प्रकरणाच्या तपासात आता मोठी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांनाच बदलण्यात आले आहे.

आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करणार आहेत. यापूर्वीच्या अनेक प्रकरणांत गंभीर गुन्ह्यांचा तपास सुनील तांबे यांनी चांगल्या प्रकारे केल्याने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सुनील तांबे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली आहे. परंतु, ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.

सध्या ललित पाटील हा नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ड्रग्ज विक्रीचे तो रॅकेट चालवत होता.

त्यामुळे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफिया यांच्या बरोबर ललित पाटील याचे आधीपासूनच संबंध असल्याने तो नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक,

वॉर्ड क्रमांक-१६ मधील कर्मचाऱ्यांची देखील समितीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णांची माहिती समितीने मागितली आहे.

समितीकडून आतापर्यंत ८० जणांची चौकशी ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण चौकशी

करण्यासाठी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने आरोप- प्रत्यारोपानंतर आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ८० जणांची चौकशी करण्यात आली आहे. प्रामुख्याने ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयातील व्यवस्थापन,

राजकीय नेते आणि पुणे शहर पोलीस त्याचबरोबर येरवडा जेल पोलिसांवर देखील या प्रकरणात संशयाची सुई आहे.

भूषण पाटीलला घेऊन नाशिकमध्ये तपास

ससूनमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर, तो फरार झाला होता. ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हादेखील मेफेड्रॉन तयार करण्यात सहभागी असल्याने पुणे पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक केली आहे.

सध्या पुणे पोलिसांचे पथक त्याला घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले असून, एमआयडीसीतील ज्या कारखान्यात भूषण मेफेड्रॉन तयार करायचा,

त्या ठिकाणी पंचनामा केला आहे. तसेच, भूषण पाटील याला त्याच्या घरी नेण्यात येणार असून, तेथेही चौकशी करण्यात येणार आहे