ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ड्रग तस्कर ललित पाटील याच्या संदर्भात पोलिसांना महत्त्वाचे दुवे हाती लागले असून, कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
त्याच्या आश्रयदात्यांना जेरबंद करण्यासाठी गोपनीयता बाळगून तपास हाती घेण्यात आला आहे.
पाटील याच्यासंदर्भात नाशिक, नवी मुंबई, पालघर परिसरातून महत्त्वाचे दुवे हाती लागले आहेत.
पुणे, नाशिक व मुंबई पोलीस स्वतंत्रपणे पाटील याचा तपास करीत असून, त्यामध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी संयुक्त पथकाकडे हा तपास सोपवण्यात येईल,
असे संकेत गृह मंत्रालयाने दिले आहेत. ससून रुग्णालयात असतानाच्या काळामध्ये पाटील याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आयफोनचा पासवर्ड पोलीस अद्याप मिळवू शकले नाहीत.
पाटील याच्या नाशिकमधील घरातून काही पेनड्राइव्ह व अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत.
त्यातील माहितीची पडताळणी तंत्रज्ञांकडून सुरू आहे. पाटील याचा भाऊ भूषण व साथीदार अभिषेक विलास बलकवडे ( वय ३२, रा. नाशिक) यांची कसून चौकशी सुरू आहे.
त्यांच्याकडून पाटील याच्या ड्रग रॅकेटची कार्यपद्धती व त्याच्या व्याप्तीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या रॅकेटमध्ये गुंडांसोबत व्यवस्थेतील काही अधिकारी व कर्मचारी सामील असल्याची सूत्रांची माहिती असून,
त्याबाबत वरिष्ठ पातळीवर तपास जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील नेमका कोठे गायब झाला?
याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील गुंडांची कसून चौकशी हाती घेण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीबरोबरच पाटील हवाला रॅकेटमध्येही सामील असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्याबाबतच्या चौकशीसाठी सोमवार पेठेतील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.