शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दिवाळीच्या काळात कोणत्या बाजार समित्या किती दिवसांसाठी राहणार बंद ? वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture News : राज्यात सर्वत्र दिवाळीची चाहूल लागली आहे. आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारसापासून हिंदू सनातन धर्मात दिवाळी सणाला सुरुवात होत असते. म्हणजे आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. दरम्यान दिवाळी सणाला शेतकऱ्यांना पैशाची निकड असल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, कापूस, कांदासमवेत सर्वच पिकांची मोठी आवक पाहायला मिळत आहे.

मात्र शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव नाहीये. यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी देखील होत आहे. सणासुदीला पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल विकावा लागत आहे. दरम्यान, दुष्काळामुळे कमी उत्पादन आणि शेतमालाला मिळत असलेला कमी दर यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढणार आहे.

दिवाळीच्या काळात दोन दिवसांसाठी राज्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. तर काही बाजार समित्या या दिवाळीच्या दिवशीही सुरू राहतील अशी माहिती समोर आली आहे. खरंतर, दरवर्षी दिवाळीच्या काळात दोन दिवसांसाठी बाजार समित्या बंद ठेवल्या जातात. पण राज्यातील काही बाजार समित्या दिवाळीच्या काळातही सुरू राहतात.

शेतकरी बांधव दीपावली पाडवा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतमाल विकून लक्ष्मी घरी घेऊन जातात. यामुळे काही बाजार समित्या या दिवाळीला देखील सुरू राहतात. येथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे पणन विभागाकडून कोणत्याच बाजार समितीला सलग तीन दिवस बंद ठेवण्यासाठी परवानगी दिली जात नाही.

मात्र अशातच नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी थोडीशी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्या तब्बल दहा दिवसांसाठी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काही बाजार समित्या तर दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस बंद राहतील असे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यामध्ये दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील इतर बाजार समित्या दीपावली पाडवा आणि लक्ष्मीपूजनलाच बंद राहणार आहेत.

तथापि हे दोन दिवस फक्त धान्य आणि भुसार मालाचे लिलाव बंद राहतील. भाजीपाल्याचे बाजार याही दिवशी चालूच राहतील. बाजार समिती बंद करण्याचा निर्णय हा बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातो. पण कोणतीही बाजार समिती सलग तीन दिवसांपेक्षा अधिक बंद ठेवली जाऊ शकत नाही.

मात्र असे असतानाही नासिक जिल्ह्यातील बाजार समित्या दहा दिवसांपेक्षा अधिक काळासाठी बंद राहणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी दोन किंवा तीन दिवसांसाठी बाजार समित्या बंद ठेवल्या पाहिजेत मात्र त्यानंतर बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी उपस्थित केली आहे.

कोणत्या बाजार समित्या किती दिवसांसाठी बंद राहणार

मनमाड एपीएमसी नऊ नोव्हेंबर पासून दहा दिवस बंद राहणार आहे.

चांदवड एपीएमसी 9 नोव्हेंबर पासून तेरा दिवस बंद राहणार आहे.

येवला एपीएमसी ८ नोव्हेंबर पासून अकरा दिवस बंद राहणार आहे.

लासलगाव एपीएमसी 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे.

सिन्नर एपीएमसी 8 नोव्हेंबर पासून 12 दिवस बंद राहणार आहे.

सटाणा APMC नऊ नोव्हेंबर पासून दहा दिवस बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.

नांदगाव एपीएमसी 9 नोव्हेंबर पासून पुढील 11 दिवस बंद राहणार आहे.

देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती 8 नोव्हेंबर पासून पुढील 13 दिवस बंद राहणार आहे. 

कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, नऊ नोव्हेंबर पासून पुढील दहा दिवस बंद राहणार आहे.   

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती 8 नोव्हेंबर पासून पुढील बारा दिवस बंद राहणार आहे.

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सात नोव्हेंबर पासून पुढील 14 दिवस बंद राहणार आहे.