Maharashtra Onion Rate : गेल्या एका महिना भरापूर्वी देशात टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. किरकोळ बाजार टोमॅटो 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिक भाव मिळत होता. मात्र सध्या स्थितीला टोमॅटोचे बाजार भाव खूपच खाली आले आहेत.
यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. पण आता राज्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभर रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये हे बाजार भाव 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील अशी आशा आहे.
बाजार समितीमध्ये देखील कांद्याचे बाजार भाव विक्रमी वाढले आहेत. अशातच मात्र आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत या चालू आठवड्यात लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याच्या बाजारभाव तब्बल 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. लासलगाव एपीएमसीमध्ये अचानक कांदा दरात मोठी घसरण झाली आहे.
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. मागील आठवड्यात लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला सरासरी पाच हजार 820 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. मात्र आजच्या लिलावात सरासरी बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला सरासरी ४७०० रुपये, जास्तीत जास्त ५२०० तर कमीत कमी २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. म्हणजेच मागील आठवड्याशी तुलना केली असता दरात पाचशे ते सातशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
देशांतर्गत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात किंमत ८०० डॉलर करण्याचा नुकताच निर्णय झाला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या किमती कमी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे शासनाने कांद्यावर लावण्यात आलेले सर्व निर्बंध उठवावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे.
गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता, यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत होता. मात्र अशातच सरकारने कांद्याचे निर्यात किंमत 800 डॉलर करण्याचा निर्णय घेऊन कांदा बाजार भाव पाडण्याचे काम केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळाली आहे.