वनाज ते रूबी हॉलदरम्यान मेट्रोची सेवा विस्कळीत ! मनपा स्थानकावर २० मिनिटे खोळंबा : प्रवाशांचे हाल, महामेट्रोकडून घटनांची चौकशी सुरू

वनाज ते रुबी हॉलदरम्यानची मेट्रोची वाहतूक गुरुवारी (दि. (२६) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास विस्कळीत झाली.

पुणे मनपा स्थानकावर २० मिनिटपिक्षा अधिक काळ मेट्रो उभी असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

पुणे मेट्रोच्या मार्गात सध्या तांत्रिक बिघाडाचा खोडा सुरू आहे. मागील सलग दोन दिवसांत मेट्रो सेवा काही काळ बंद पडली होती.

त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वारंवार घडणाऱ्या या घटनांची चौकशी महामेट्रोने सुरू केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

रुबी हॉल ते बनाज मार्गावरील मेट्रो सेवा मंगळवारी (दि. ३ ऑक्टोबर) अचानक अर्धा तास खंडित झाली होती.

या मार्गावरील मेट्रो २१ मिनिटे नळस्टॉप स्थानकावर थांबून होती. मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन सेवा बंद झाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ४) मेट्रोच्या गाडीत तांत्रिक बिघाड झाला. गाडी काही मिनिटे विलंबाने आणि संथगतीने आली. प्रवाशांनी आतमध्ये जाण्यासाठी दरवाजासमोर गर्दी केली. परंतु, ते उघडले नाहीत.

अखेर काही वेळाने दरवाजे न उघडताच मेट्रो पुढे गेली. त्यानंतर काही मिनिटांनी आलेल्या दुसऱ्या मेट्रोने प्रवाशांना प्रवास करावा लागला. मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत.

त्यामुळे आता मेट्रोने बुधवारी झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २६) पुन्हा बिघाड झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली.

महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे म्हणाले, मेट्रोच्या दरवाजाच्या सेन्सरमध्ये समस्या निर्माण झाल्याने गुरुवारी तांत्रिक अडचण निर्माण झाली.

मेट्रोत एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास प्रत्येक विभागाची शीघ्र प्रतिसाद पथके आहेत.

जिथे बिघाड झाला असेल, तिथे ती तातडीने पोहोचून दुरुस्ती करतात. तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या कारणांची चौकशी केली जाते.

याचबरोबर संबंधितांना याबाबत विचारणाही केली जाते. आगामी काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलली जात आहेत.