मुंबई लोकलचा विस्तार होणार ! ‘या’ मार्गावर धावणार लोकल ट्रेन, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

Mumbai Local Railway News : मुंबई व लगतच्या परिसराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे मुंबई व एमएमआर क्षेत्रातील नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.

मुंबईकरांसाठी विविध मार्गांवर लोकल सुरू केल्या जात आहेत. याशिवाय शहरात आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची देखील कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. तर काही कामे पूर्ण होऊनहीं अजून या प्रकल्पांचा नागरिकांना फायदा होत नाहीये. यामध्ये उरण ते खारकोपर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचा देखील समावेश होतो.

हा रेल्वे मार्ग तब्बल 26 वर्षांपासून रखडला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील हा अडीच दशकांपासून रखडलेला रेल्वे मार्ग गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल असे वृत्त समोर आले होते. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असा देखील दावा केला जात होता.

मात्र या रेल्वे मार्गाच्या उदघाट्नाला अजूनही मुहूर्त लाभत नाहीये. खरंतर नेरूळ ते खारकोपर हा 26.7 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग 1997 मध्ये मंजूर करण्यात आला. मात्र या रेल्वे मार्गाच्या कामात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे याचे काम जलद गतीने होऊ शकले नाही. 2018 मध्ये या संपूर्ण मार्गाचा पहिला 12 किलोमीटर लांबीचा टप्पा अर्थातच नेरूळ ते बेलापूर सुरू करण्यात आला.

मात्र या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण अजूनही सुरू झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खारकोपर ते उरणदरम्यानच्या पाच स्थानकांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा 14.6 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावर मार्च महिन्यात पहिल्यांदा लोकल धावली होती.

त्यामुळे लवकरच हा मार्ग सुरू होणार असे सांगितले जात होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हा मार्ग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या तारखा देखील देण्यात आल्यात. मात्र अजूनही हा मार्ग सुरू झालेला नाही. यामुळे आता हा रेल्वे मार्ग केव्हा सुरू होणार हा प्रश्न उरणकरांकडून उपस्थित केला जात आहे.

अशातच आता खारकोपर ते उरण दरम्यान लवकरच लोकल धावणार असल्याचे सांगितले जात आहे. या मार्गावर लोकल केव्हा सुरू याबाबत प्रशासनाने कोणतीच माहिती दिलेली नाही परंतु येत्या काही दिवसात या मार्गावर लोकल धावणार हे जवळपास स्पष्ट होत आहे.

मध्य रेल्वेच्या उपव्यवस्थापकांनी या मार्गाची नुकतीच पाहणी केली आहे. त्यामुळे हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा मार्ग सुरू झाला की उरणकरांना सीएसएमटी पर्यंत लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या भागातील विकास निश्चित होणार आहे.

त्यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास यामुळे गतिमान होणार आहे. हा रेल्वे मार्ग उरण शहराला मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे. नेरूळ ते खारकोपर या रेल्वे मार्गावर नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर ही महत्त्वाची रेल्वे स्थानके विकसित करण्यात आली आहे.

तसेच खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गावर गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वेस्थानके विकसित करण्यात आली आहेत. या स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली असून आता या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.