मुंबई ते ठाण्याचा प्रवास होणार गतिमान ! ‘या’ मार्गावर 2 टप्प्यात सुरू होणार मेट्रो, कसा असेल रूट, केव्हा धावणार Metro ?

Mumbai-Thane Metro : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरात वसलेल्या नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि गतिमान करण्यासाठी विविध मार्गांवर मेट्रो सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा देखील मिळत आहे. मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास गतिमान झाला आहे.

दरम्यान मुंबई ते ठाणे हा प्रवास सुपरफास्ट व्हावा म्हणून एम एम आर डी ए च्या माध्यमातून मेट्रो मार्ग चार विकसित केला जात आहे. हा मेट्रो मार्ग जवळपास 32 किलोमीटर लांबीचा राहणार असून एकूण दोन टप्प्यात सुरू केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोड ते मुलुंड दरम्यान मेट्रो सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या पहिल्या टप्प्याचे काम सध्या स्थितीला युद्ध पातळीवर सुरू असून हा पहिला टप्पा 2025 पर्यंत पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ए अंतर्गत वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. सध्या स्थितीला मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के एवढे पूर्ण झाले असून मेट्रो-4 ए मार्गाबाबत बोलायचं झालं तर याचे काम 61 टक्के एवढे पूर्ण झाले आहे.

दरम्यान या मेट्रोमार्गाबाबत आता एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. खरंतर हे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घरापासून स्टेशन पर्यंत प्रवासी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

मेट्रो-4 कॉरिडॉरजवळील परिसरात मल्टीमॉडल इंटिग्रेशन ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार केली जाणार आहे. या कामासाठी आता एमएमआरडीएकडून सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.

हा मार्ग सुरू झाल्यानंतर मेट्रो स्टेशनवरून उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम स्थळी सहज पोहोचता यावे यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी विकसित करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

याअंतर्गत स्टेशन परिसराजवळ बस स्टॉप, ऑटो स्टँड, फूटपाथ, सायकल ट्रॅक, माहिती फलक यासह इतर सुविधा विकसित केल्या जाणार असे सांगितले जात आहे.

याशिवाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी फीडर बस सेवा देखील सुरू केली जाणार आहे. याचा आराखडाही तयार झाला आहे. यामुळे मुंबईमधील मेट्रो प्रवाशांचा मेट्रो प्रवास आणखी सुलभ आणि जलद होणार आहे.