Onion Rate Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विजयादशमीच्या सणाला एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे कांद्याच्या बाजारभावात चांगली विक्रमी वाढ झाली आहे. खरंतर, या वर्षी कांद्याच्या बाजारात मोठा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव यंदा चांगल्या भावपातळीवर होते.
पण फेब्रुवारी महिन्यात अचानक बाजारभावात मोठी घसरण झाली. मार्चमध्ये तर बाजारभाव दोन ते तीन रुपये प्रति किलो एवढे खाली आलेत. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये एवढे अनुदान शिंदे सरकारने जाहीर केले असून सध्या स्थितीला कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे. पण ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही त्यांना लवकरात लवकर अनुदान दिले जाणार आहे.
दरम्यान, कांद्याचे बाजारभाव मार्च महिन्यानंतरही दबावातच पाहायला मिळाले आहेत. थोड्याफार प्रमाणात बाजारभावात वाढ झाली मात्र बाजार पूर्णपणे दबावातच होता. जवळपास जून महिन्यापर्यंत बाजारभावात मंदी कायम राहिली. परंतु जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी आली होती.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला होता. अशातच मात्र ऑगस्ट महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. किरकोळ बाजारातील किमती नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यंतरी कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा दबावात आले होते.
पण आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बाजार भावात थोडीशी तेजी पाहायला मिळत आहे. आता बाजारात नवीन हंगामातील लाल कांदा देखील दाखल होत आहे. विशेष म्हणजे काल विजयादशमीच्या मुहूर्तावर लाल कांद्याला तब्बल 11 हजार 111 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, काल नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील खारीफाटा येथील बाजारात काल कांद्याच्या लिलाच्या कांद्याला तब्बल 11 हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
याशिवाय, नाशिक जिल्ह्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या लाल कांद्याला तब्बल 9 हजार 111 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.