सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी पावणे तीन या कालावधीत एकही लोकल नसते.

त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल होतात. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मधल्या काळात लोकल सुरु करावी, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागाची बैठक शनिवारी (दि. १४) पार पडली. या बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे,

खासदार श्रीनिवास पाटील, महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे,

उप महाव्यवस्थापक अजय मिश्रा, वरिष्ठ मुख्य परिवहन व्यवस्थापक श्याम सुंदर गुप्ता, वरिष्ठ मुख्य सुरक्षा आयुक्त अजोया सदानी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानासपुरे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सकाळी १०.५ मिनीटांनी लोणावळा स्थानकावरून लोकल आहे.

त्यानंतर सुमारे पावणे पाच तास एकही लोकल नाही. दुपारी २.५० ला नंतरची लोकल सुटते. वडगाव, कान्हे, कामशेत,

मळवली या परिसरातून लोणावळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची गैरसोय होते. असे खासदार बारणे यांनी सांगतिले.

कान्हे फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तिथे जमीन संपादित करण्यासाठी काही अडचणी येत आहेत.

त्यावर मार्ग काढावा. तसेच वडगाव येथील भूमिगत मार्गाचे काम सुरु करावे, अशा सूचना देखील खासदार बारणे यांनी रेल्वे विभागाला दिल्या आहेत.

सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला तळेगाव स्थानकावर थांबा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा देण्यासाठी तांत्रिक बाबींची पडताळणी सुरु आहे.