Pune News : ‘पुलाला ‘ट्रोल’ केले जातं आहे, हे आज पहिल्यांदा पाहतोय’…

Pune News : पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास जीवघेणा अपघात झाला.

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. आगीत ट्रकच्या केबिनमध्ये असलेल्या चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

त्यानंतर सोशल मीडियावर नवले पुलाला इन्फ़्लुएनर्ससकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

‘सोशल मीडियावर आजपर्यंत अनेक गोष्टींची खिल्ली उडवताना, ‘रोस्ट’ करताना पाहिलेलं आहे.

पण पुलाला ‘ट्रोल’ केले जातं आहे, हे आज पहिल्यांदा पाहतोय,’ अशी खंत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

‘रोहीत शेट्टी गाड्या फोडायला नवले पूल विकत घेणार आहे’, ‘धोका, डर, खौंफ यांना समानार्थी शब्द म्हणजे ‘नवले पूल’, ‘खरे खतरो के खिलाडी नवले पुलावरून अपडाऊन करणारे लोक आहेत’ या शब्दात सोशल मीडियावर नवले पुलाला ट्रोल केले जात आहे.

चुकीच्या गोष्टींमुळे नवले पुलाला ट्रोल केले जाईल. तसेच इतकी प्रसिद्धी मिळाली असली तरी देखील या पुलाचे अडथळे अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दूर केलेले नाहीत.

नागरिक जर पुलांना ट्रोल करत असतील तर विकासाची दिशा भरकटली आहे, हे नक्की! असेही मत आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे.

दरम्यान, नवले पुलाजवळील जीवघेणा अपघात ही एक दुर्दैवी घटना आहे. नवले पुल हा किती धोकादायक आहे.

हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पुलाची रचना चुकीची आहे. हे वेळोवेळी अनेकांनी निदर्शनास आणून दिले असून तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

त्यामुळे पुलावरील अपघाताचा आकडा शून्य कधी होणार? असा सवाल उपस्थित होतोय.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठोस उपाययोजना करून अपघाताचा आकडा शुन्यावर नेण्यास प्रयत्न करावेत.’ अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.