पुणेकरांसाठी गोड बातमी ! शहरातील ‘या’ भागात तयार होणारा दोन नवीन उड्डाणपूल, प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर

Pune News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची देखील संख्या वाढली आहे. अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे.

हेच कारण आहे की आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते सुधारले जात आहे. शहरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून आणि अपघातातून दिलासा मिळावा म्हणून शहरात दोन नवीन उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे उड्डाणपूल तयार केले जाणार असून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून कात्रज- देहू बाह्यवळण महामार्गावर दोन उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्प अहवालानुसार, कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी व्हायडक्ट ते सनसिटी अंडरबायपासपर्यंत सुमारे सव्वापाच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे.

तसेच किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सुमारे साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या दोन उड्डाणकुलामुळे या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या या प्रस्तावात जांभूळवाडी व्हायडक्टपासून सनसिटी अंडरपासपर्यंत सुमारे सव्वापाच किलोमीटरचा तीन लेनचा उन्नत मार्ग तयार केले जाणार असे म्हटले आहे.

तसेच किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत सुमारे ८.६ किलोमीटरचा सहा लेनचा उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय येथील जंक्शनमध्ये सुधारणा, सेवा रस्त्यांचे जाळे तयार करणे आणि पवना, मुळा व मुठा नद्यांवर पुलांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मुळा आणि मुठा नदीवर तीन लेनचे पूल प्रस्तावित असून पवना नदीवरील सध्याच्या पुलाचे विस्तारीकरण केले जाईल असे या प्रकल्प अहवालात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी 4,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर सुमारे तीन वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी माहिती संबंधितांनी केली आहे. निश्चितच केंद्र शासनाने जर या प्रकल्पाला मंजुरी दिली तर पुणे शहरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.