Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या अशा पुणे रिंग रोड बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये ट्रॅफिक जामची समस्या एक कॉमन गोष्ट बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे मात्र सर्वसामान्य पुणेकर हैराण झाले आहेत.
पुणेकरांना वाहतूक कोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हेच कारण आहे की, शहरात विनाकामाची होणारी वाहतूक बाहेरून वळवण्यासाठी बाह्य रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान या राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोड बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर हा मार्ग पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आला आहे.
या 172 किलोमीटर लांबीच्या आणि 110 मीटर रुंदीच्या मार्गासाठी 35 आणि पूर्व भागातील 49 गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी भूसंपादनाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जमिनीचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनाचे काम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे.
आतापर्यंत 721 हेक्टर जमिनीपैकी 205 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. तसेच पश्चिम भागातील ज्या शेतकऱ्यांनी संमतीने जमिनी देण्यास नकार दिला आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता सक्तीने संपादित केल्या जाणार आहेत. पश्चिम भागातील 31 गावांमधील सुमारे 411 हेक्टर क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे.
भूसंपादनाच्या मोबदल्यात आतापर्यंत 205 हेक्टर जमिनीसाठी 1300 कोटी रुपयांची रकमेचे वाटप करण्यात आले आहे. सुरुवातीला राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला 1 हजार 35 कोटी रुपये दिले होते. यापैकी 1021 कोटी रुपयांचे वाटप झाले होते. यानंतर 636 कोटी रुपये देण्यात आले. म्हणजेच आत्तापर्यंत जिल्हा प्रशासणाला 1676 कोटी रुपये मिळाले आहेत.
यापैकी 1300 कोटी रुपयांचे आतापर्यंत वाटप झाले आहे. दरम्यान, जिल्हा दर समितीच्या बैठकीत पश्चिम भागातील ३१ तर पूर्व भागातील ४ गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी भूसंपादनाचे निवाडे जाही करण्यात येणार आहेत. यात ५१६ हेक्टर भूसंपादन करणे प्रस्तावित आहे.
यामध्ये पूर्व भागातील 105 आणि पश्चिम भागातील 411 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पश्चिम भागात आत्तापर्यंत 205 हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र बहुतांशी गावांमधील सरसकट संपादन होऊ शकलेले नाही. यामुळे आता 31 गावांमधील 411 हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन केले जाणार आहे.
कोणत्या गावातील जमिनींचे होणार सक्तीने संपादन
मुळशी तालुक्यातील जवळ, केमसेवाडी, अंबडवेट, पिंपवली, पडघळवाडी, रिहे, मातेवाडी, घोटावडे, उरावडे, मारणेवाडी, आंबेगाव, मुठा, कातवडी या तेरा गावांमध्ये सक्तीने संपादन होणार आहे. मावळ तालुक्यातील उर्से, परंदवाडी, बेबळ ओव्हळ, धामणे, चांदखेड, पाचाणे या सहा गावांमध्ये सक्तीने संपादन होणार आहे.
हवेली तालुक्यातील थोपटेवाडी, मांडवी बु. मोरदरवाडी, खामगाव, मावळ, वडदरे, मालखेड, सांगरून, भगतवाडी, कल्याण, रहाटवडे, बहुली या दहा गावांमध्ये सक्तीने संपादन होणार आहे. तसेच भोर तालुक्यातील कुसगाव, रांजे या दोन गावांमध्ये सक्तीने संपादन होणार आहे.