Pune Railway News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील नागरिकांसाठी अर्थातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की रेल्वे प्रवाशांसाठी पुणे रेल्वे विभागाने एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि गतिमान होणार आहे. खरंतर रेल्वे हे देशात प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. पुण्यातीलही लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
दरम्यान पुणे शहरातील नागरिकांचा रेल्वे प्रवास गतिमान व्हावा यासाठी हडपसर ते पुणे स्टेशन दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या म्हणजे तिसरी लाईन विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. Pune Railway विभागाने याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.
तसेच या तिसऱ्या लाईनला घोरपडी येथील कोचिंग डेपोला जोडणे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. जर पुणे रेल्वे विभागाने तयार केलेले हे प्रस्ताव जर मान्य झाले तर घोरपडी ते पुणे स्थानकावर रेल्वे आणण्यासाठी मिरज व सोलापूरच्या लाईनचा वापर करावा लागणार नसल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे.
तसेच या तिसऱ्या लाईनमुळे भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे सुरू होऊ शकणार आहे. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर दररोज एका रेल्वे गाडीचे इंजिन बदलण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ वाया जातो.
पुणे रेल्वे स्थानकावर फलाट उपलब्ध होत नसल्याने इंजिन बदलत असताना इतर गाड्यांना इंजिन बदलेपर्यंत वाट पाहावी लागते. पुणे स्टेशनवरून रेल्वे गाडीचे इंजिन बदलण्यासाठी अथवा घोरपडी येथील पिट लाइनवर गाडी घेऊन जाण्यासाठी सध्या सोलापूर किंवा मिरज लाईनचा वापर केला जात आहे.
यामुळे मात्र इंजिन बदली करतांना या दोन्ही लाईन ब्लॉक होतात. याचा परिणाम हा गाड्यांच्या वेळापत्रकावर होत आहे. या प्रक्रियेमुळे दौंडमार्गे किंवा मिरजकडून पुणे स्थानकावर येणाऱ्या ट्रेनला इंजिन बदलेपर्यंत स्थानकावर थांबावे लागत आहे.
म्हणून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. पण आता प्रवाशांचा हा वेळ वाचावा यामुळे रेल्वे प्रशासनाने हडपसर ते पुणे स्थानकांदरम्यान तिसरी लाईन टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला तर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक गतिमान आणि आरामदायी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.