दहीहंडी उत्सवादरम्यान फ्लेक्सवरील फलक बोर्ड आणि जाहिराती संदर्भात दंड भरण्यासंदर्भात
पुणे महानगरपालिकेने दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आणि माझ्यावरील आकसापोटी देण्यात आली आहे,
असा दावा भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख आणि उद्योगपती पुनीत बालन यांनी केला आहे.
पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी शहर विद्रुपीकरणाबाबत तीन कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस दिली होती.
या नोटिसीवरून राजकारण आणि इतर बाबींबाबत चर्चा सुरू झाली होती. या नोटिसीला उत्तर देताना बालन यांनी म्हटले आहे की,
नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस तुम्ही मंडळांना देण्याऐवजी तुम्ही जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करण्याकरिता माझ्या नावे नोटीस दिली आहे.
याबाबत आमच्या कायदेशीर हक्काला बाधा न येता आमचे उत्तर खालीलप्रमाणे असणार आहे. सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्याला निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे,
असे एका वृत्तपत्रात आले आहे. तसेच, तुमचे पत्र जावक क्रमांक ई / ५७४६ दि. ४ जानेवारी २०२३ सदर उपसचिव, महाराष्ट्र शासन,
गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांच्याकडे सादर केलेले पत्र. या पत्रात तुम्ही नमूद केले आहे की पुणे शहरातील गणेशोत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप,
स्टेजकरिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच, सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्कदेखील रद्द केले होते.
त्यामुळे तुम्ही दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी पुनीत बालन यांनी केली आहे.