पुरंदर आणि बारामती तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे.

त्यानुसार बारामती आणि पुरंदर तालुक्यात तीव्र तर दौंड, शिरूर आणि इंदापूर तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खरीप हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत करून जिल्हानिहाय दुष्काळ तीव्रतेचे निकष लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांना हे निकष लागू झाले होते. त्यामध्ये शिरूर, मुळशी, दौंड, पुरंदर, वेल्हा,

बारामती आणि इंदापूर या तालुक्यांचा समावेश होता. परंतु, यातील वेल्हा आणि मुळशी तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत.

दुष्काळी तालुक्यांतील दहा टक्के गावे निवडून महामदत मोबाइल अॅपच्या मदतीने दुष्काळाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आले होते.

त्यानुसार पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्यातील सर्व माहिती एकत्रित करून शासनाकडून दुष्काळाची घोषणा ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी करण्याची शक्यता आहे.

त्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार आहे. या पथकाच्या अहलानंतरच किती मदत मिळेल, हे स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.