Pune News : शरद पवार साडेतीन जिल्ह्यांचे प्रधानमंत्री बनले होते

Pune News : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोत्कृष्ठ काम केले. त्यांच्या पाठित खंजीर खुपसला.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी फडणवीसांना थांबवले. पण, इथले इथेच फेडावे लागले. आज त्यांची परिस्थिती काय आहे ?

ही महाराष्ट्राची जनता पाहते आहे. ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद गेले. पार्टी गेली. हेच हाल शरद पवारांचे असून ते साडेतीन जिल्ह्याचे प्रधानमंत्री बनले होते, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि.१२) केली.

भाजपातर्फे शिरुर लोकसभा मतदारसंघात दिघीमध्ये घर चलो अभियान पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री बाळा भेगडे, निवडणूक प्रमुख महेश लांडगे,

शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरी निवडणूक प्रमुख विकास डोळस, संयोजक विजय फुगे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, महिला आरक्षण कायद्यामुळे संसदेत १९१ महिला खासदार होणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा सभागृहात १०० महिला आमदार होणार आहेत. त्यामुळे देशातील १४० कोटी लोकांना मोदीच पुन्हा प्रधानमंत्री हवे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे राम मंदिर साकारात आहे. पण,

मोदींना हरविण्यासाठी मुंबईत २८ पार्टी एकत्र आल्या. त्यातील एका पार्टीचे मुख्यमंत्री स्टॅलीनचा यांचा मुलगा उदयनिधी देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू, असे म्हणतो.

याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. आत्मनिर्भर भारत करायचा असेल, तर मोदींना साथ द्या, असेही बावनकुळे म्हणाले.

शिरूरसाठी आमदार लांडगे इच्छुक :
लोकसभा मतदारसंघात अभियान सक्षमपणे राबवल्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सभेत आमदार महेश लांडगे यांचे कौतुक केले.

तर, पत्रकारांशी बोलताना शिरुर लोकसभा मतदारसंघातून आमदार लांडगे यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले.

उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्षाची केंद्रीय संसदीय समिती अंतिम निर्णय घेईल, असे बावनकुळे यांनी म्हटले.