शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा ! भुजबळांच्या सुटकेसाठी फडणवीस यांना लिहिलेले पत्र दाखवले

मी तुरुंगात असताना शरद पवार हे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता.

भुजबळ यांच्या या आरोपाला रविवारी शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात चोख उत्तर दिले.

या वेळी पवार यांनी २०१८ साली भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्या सुटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र दाखवत भुजबळांवर निशाणा साधला.

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना पवार यांनी लिहिलेल्या पत्रात छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असून त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,

गृहमंत्री आदी पदे भूषवली आहेत. त्यांनी सार्वजनिक जीवनात ५० वर्षांहून अधिक काळ घालवला असून, राज्याच्या विकासात योगदान दिले आहे.

सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेला नसल्याने त्यांना निर्दोष समजावे आणि त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत.. चांगले उपचार मिळणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.

जर त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा या पत्राच्या माध्यमातून फडणवीस सरकारला दिला होता.

या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, भुजबळ यांनी ते तुरुंगात असताना मी त्यांच्या पाठीशी नव्हतो, या केलेल्या आरोपाला हे पत्र उत्तर आहे.

भुजबळ यांनी मी भाजपसोबत युतीसाठी चर्चा करायचो, असा आणखी एक आरोप केला आहे. मात्र मी भाजपसोबत कधीच गेलो नाही,

मात्र माझ्यावर आरोप करणारेच भाजपसोबत गेले आहेत, असा टोला पवार यांनी भुजबळांना लगावला.