Pune News: ससून रुग्णालयात उघडकीस आलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटसंदर्भात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे होत असून,
या प्रकरणात सामील असलेल्या ‘कोर्ट कंपनी’च्या काही अधिकाऱ्यांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती मंगळवारी पोलीस सूत्रांनी दिली.
मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ३ ऑक्टोबर २०२३ ला नाशिकजवळील गावात छापा टाकून मेफेड्रॉन (एमडी) बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला.
त्या प्रकरणात पाटील याचा तपास सुरू होता. त्याच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपताच पुणे पोलिसांनी न्यायालयीन वॉरंटद्वारे पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ससून रुग्णालयात ३० सप्टेंबर २०२३ ला उघडकीस आलेले ड्रग्ज रॅकेट, त्यानंतर या रुग्णालयातून पाटील याने केलेल्या पलायनाबाबत पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या तपासासाठी शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक कार्यान्वित केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील याची सूत्रबद्ध चौकशी हाती घेण्यात आली असून, तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सूची तयार केली आहे.
ससून रुग्णालयात अमली पदार्थांचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर २ ऑक्टोबर २०२३ ला पाटील याने पलायन केले.
त्यानंतर तब्बल सोळा दिवसांनंतर बुधवारी नेपाळच्या सीमेवर मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याआधी त्याचा भाऊ भूषण व साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली.
त्याला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून अॅड. प्रज्ञा कांबळे व अर्चना नवले (दोघी रा. नाशिक) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मुंबई पोलिसांनी हस्तांतरित केलेल्या पाटील याच्या प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक नावे पुढे आली आहेत.
कारागृहातून रुग्णालयात व तेथून तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकण्यासाठी त्याने खर्च केलेल्या रकमेचा आकडा ऐकून पोलीस चक्रावले आहेत.
त्यापैकी बहुतांश रक्कम तो मुख्यालयातील ‘कोर्ट कंपनी’तील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांवर,तसेच रुग्णालयीन व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उधळत होता, असे जबाबावरून पुढे आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांची तपशीलवार माहिती व त्याबाबतचे तांत्रिक पुरावे संकलित केले जात आहेत.
मटका किंग’ सावलाची होणार चौकशी
ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्यासोबत ससून रुग्णालयात मुक्काम ठोकलेल्या मटकाकिंग वीरल सावला यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.
सावला याच्याच गुन्हेगारी जाळ्याचा वापर पाटील अमली पदार्थांच्या तस्करीसाठी करत असावा,
असा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत माहिती उघड झाल्यावर सावला यालाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
‘ससून’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी
ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, त्याच्यावर उपचार करणारे दुसरे-तिसरे कुणी नसून,
खुद्द ससून हॉस्पिटलचे डीन असल्याची माहिती रुग्णालयातील नोंदींवरून पुढे आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.