… तर माझीही सखोल चौकशी करा !

Pune News : ड्रग्ज तस्करांना लोकप्रतिनिधी फोन करत आहेत का, याची चौकशी करून कारवाई करा. मी जर फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा,

असे खुले आव्हान देत पालकमंत्री दादा भुसे यांनी, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे का?

कोणी फोन करतेय का? पुण्यात देखील कोणी फोन केलाय का ? याचाही सखोल तपास करा, असे बजावले.

ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर विरोधकांकडून आरोप सुरू आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीला सत्ताधारी पक्षातील मंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने शुक्रवारी मोर्चा काढण्याचे जाहीर केले.

त्यापूर्वीच अमली पदार्थविरोधी जनजागृतीतून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे.

या अनुषंगाने मंगळवारी आयोजित प्रशासकीय बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अमली पदार्थ प्रकरणांचे लागेबांधे शोधण्याची सूचना यंत्रणेला करण्यात आल्याचे भुसे यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी थेट फिल्डवर उतरून कारवाई केली पाहिजे. असे झाले नाही,

तर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करण्यात येईल, असा सूचक इशाराही भुसे यांनी पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात थांबणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तेथे पोलीस कर्मचारी नेमा,

असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. हे प्रकार कुठल्याही परिस्थितीत थांबले पाहिजेत, असा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील काही महाविद्यालयांतील नायजेरियन विद्यार्थ्यांचा उपद्रव स्थानिक नागरिकांना होत असल्याची भुसे यांनी नोंद घेतली. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणात अगदी मी फोन केले असतील, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, तर चौकशी करा. कुणालाही सोडू नका,

अशा सूचना पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी देखील याबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.