शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ऐन दिवाळीत सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा, या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव

Soyabean Market : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या काळात एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी अधिक खास राहणार आहे.

कारण की, सोयाबीन दरात गेल्या अनेक दिवसांच्या मंदीनंतर आता तेजी आली आहे. बाजारात आलेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला बाजारात खूप चांगला भाव मिळाला होता.

यामुळे गेल्या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले होते. मात्र गेल्या वर्षी बाजारात मालाला चांगला भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. परिणामी यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे.

याशिवाय पावसाळी काळात चांगला पाऊस बरसला नसल्याने उत्पादनात विक्रमी घट आली आहे. विशेष म्हणजे उत्पादनात घट आलेले असतानाही बाजारातील मंदी या हंगामातही कायमच आहे.

हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात होता. यामुळे पिकासाठी आलेला खर्च भरून कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा झाला होता. पण आता सोयाबीन दरात सुधारणा होऊ लागली आहे.

दिवाळीच्या काळातच सोयाबीन दरात सुधारणा झाली असल्याने यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा घेऊन आली असल्याचे बोलले जात आहे. खरंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून सोयाबीन दरात सातत्याने सुधारणा होत आहे.

गेल्या दोन आठवड्यांच्या काळात सोयाबीन दरात 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल एवढी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज देखील राज्यातील बहुतांशी मार्केटमध्ये बाजारभावात किंचित सुधारणा झाली आहे. सोयाबीन दर आता साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलकडे वाटचाल करू लागले आहेत.

आज राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव देखील 4400 ते 5170 रुपये प्रति क्विंटल दरम्यान पोहचले आहेत.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज ओसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज सोयाबीनला 5274 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

या मार्केटमध्ये आज 10565 क्विंटल सोयाबीन आवक झाली होती आणि आज या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4501 रुपये, कमाल 5274 रुपये आणि सरासरी 5190 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.