Sugarcane Farming : उस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. ऊस हे एक प्रमुख बागायती पीक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र ऊस हे पीक शेतकऱ्यांसाठी थोडेसे डोईजड ठरले आहे. ऊस तोडणी मजुरांकडून तसेच वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. शिवाय दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या पुढ्यात उपस्थित झाला होता. याशिवाय विविध रोगामुळे आणि हवामानामुळे उसाचे टनेज घटत चालले आहे.
एवढेच नाही तर उसाचा साखर उतारा देखील कमी होऊ लागला आहे. या सर्वांचा फटका म्हणून उसाचे पीक आता शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. यंदा तर कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनातं विक्रमी घट येणार आहे. अशातच मात्र पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी विठ्ठल साखर कारखान्याने प्रोत्साहन पर बक्षीस योजना जाहीर केली आहे. खरंतर यंदा उसाचे उत्पादन घडणार आहे यामुळे अधिकचा ऊस मिळवण्यासाठी ही बक्षीस योजना साखर कारखान्याने जाहीर केली आहे.
या बक्षीस योजनेअंतर्गत शंभर टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतक-याला प्रती टन दहा रूपये, अडीचशे टनासाठी पंधरा रूपये, पाचशे टनासाठी 25 तर एक हजार टनासाठी 50 रूपये बक्षीस म्हणून अधिकचे दिले जाणार आहेत. यामुळे कारखान्याला मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस घालतील असा आशावाद व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रोत्साहनपर बक्षीस योजनेचा ऊस उत्पादकांना देखील दिलासा मिळणार आहे. एकंदरीत उसाच्या उत्पादनात आलेली घट यामुळे साखर कारखानदार देखील कारखान्याला शेतकऱ्यांनी अधिक ऊस घालावा यासाठी विविध योजना राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखान्याने देखील अधिकचा ऊस मिळवण्यासाठी ही प्रोत्साहन पर बक्षीस योजना सुरू केली आहे. पण यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विठ्ठल साखर कारखान्याने घेतलेल्या या निर्णयाचे परिसरातील ऊस उत्पादकांकडून स्वागत करण्यात आले आहे.