Pune News : महामेट्रो अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, कोरोना प्रादुर्भाव,
स्टेशनच्या जागेत केलेले बदल या सर्वांमुळे जमिनीचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाचा खर्च तब्बल दोन हजार कोटींनी वाढला असल्याची कबुली केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मंगळवारी (दि.१७) दिली. मार्च २०२४ पर्यंत दोन्ही मेट्रोमार्ग सुरू होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्ही. मुरलीधरन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते.
मुरलीधरन म्हणाले, पुणे शहर व परिसरात पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू असल्याने पुणे शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरणार आहे.
पायाभूत सुविधांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये नव्याने मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
परंतु, २०१९ मध्ये कोरोना प्रादुर्भाव, स्वारगेटमधील मेट्रो स्थानकात करण्यात आलेला बदल यामुळे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे.
त्यामुळे जमिनीच्या दरात वाढ झाल्याने याचा परिणाम मेट्रोच्या खर्चावर झाला आहे.. मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तो आता १३ हजार कोटी ६५६ कोटी रुपयांनी वाढला आहे.
जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या वाढीव खर्चाचा भार कोणी उचलायचा, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने याबाबत केंद्रीय आणि राज्य पातळीवर बैठका घेण्यात येणार असून गुणोत्तरानुसार खर्च उचलला जाईल किंवा नाही, याबाबत लवकरच बैठका घेतल्या जातील, असे मुरलीधरन यांनी स्पष्ट केले.