पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा वेगात सुरू आहे. महाराष्ट्रात ९२ प्रकल्पांतील १४३२. ०५ किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्ते कामासाठी ११६० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
या योजनेच्या तिन्ही टप्प्यांमध्ये आतापर्यंत एकूण ३२ हजार किमी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून २८ हजार किमीचे रस्ते गुळगुळीत झाले आहेत,
अशी माहिती राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ग्रामीण भागातील विकास साधण्याच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व ओळखून केंद्र सरकारच्या वतीने वर्ष २००० मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्रीय ग्रामसडक मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील दुर्गम भागात असलेली गावे, पक्के रस्ते उभारून मोठ्या गावांना व शहरांना जोडण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत सध्या तिसऱ्या टण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात २०२४-२५ पर्यंत मुदतीत ८४२ प्रकल्प हाती घेतले आहेत.
एकूण ५४६९.६६ किमी रस्त्यांचे जाळे याअंतर्गत टाकण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यात आतापर्यंत ९२ प्रकल्प म्हणजेच १४३२.०५ किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित ७५० रस्त्यांच्या ४०३७.६१ किमी रस्त्यांचे काम सुरू असून नियोजित वेळेत पूर्ण केले जाणार आहे.
२०१९-२० पासून तिसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. कोरोना महामारीमुळे रस्ते बांधणीच्या कामावर व्यापक परिणाम झाला.
मात्र आता रस्त्यांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ३२२७२.३७ इतक्या किमीची कामे हाती घेतली असून २८१६८. ३६ किमीची कामे पूर्णत्वास आली आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील कामांचा समावेश असल्याने ४१०४. ०२ किमीचा फरक दिसत आहे. मात्र, २०२४-२५ पर्यंत ही कामे पूर्ण करू.
तसेच एकदा रस्ते बनवल्यानंतर त्यांची दुरुस्ती आणि देखभाल पाच वर्षांसाठी ठेकेदाराकडे असेल.
त्यामुळे रस्ते दुरुस्ती किंवा डागडुजीची कामे ठेकेदाराकडून करून घेतली जातील, असे ग्रामविकास विभाग पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे सचिव खंडेराव पाटील यांनी सांगितले.
या योजनेसाठी केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के निधी खर्च करत असल्याचे ते म्हणाले.
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात ५६१० रस्त्यांची कामे हाती घेतली. त्यांची लांबी २४२१५.१९ किमी इतकी होती. ७१८९. ५० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ५५९४ प्रकल्प म्हणजेच २४१५०. ३९ किमी इतकी कामे पूर्ण झाली असून त्यासाठी ७२०० कोटी रुपये खर्च करण्यात आला.
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात २५८७.५२ किमी लांबीची ३८५ कामे हाती घेतली. १५११.१३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यापैकी २५८५.९१ म्हणजे ३८४ प्रकल्प पूर्ण झाले. त्यावर १५१०७१ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात ५४६९.६६ किमीचे ८४२ रस्ते प्रकल्प हाती घेतले. ४१२८.६३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यापैकी १४३२.०५ किमीचे ९२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्प कामावर ११६०.५२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.