‘आयसीयू बेड शिल्लक नाही, अजित पवार भानावर या’

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या पाच दिवसांत हजारी अत्यवस्थ रुग्ण निर्माण झालेले आहेत.

पुणे शहरातील कुठल्याच हॉस्पिटलमध्ये सध्या ‘आयसीयू’ या बेड शिल्लक नाहीत. अशा पद्धतीची भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना पालकमंत्री अजित पवार देवदर्शनामध्ये आणि जेसीबीतून होणारी फुलांची उधळण अंगावर घेण्यात,

स्वागत सत्कार आणि हार-तुरे स्वीकारण्यामध्ये मग्न आहे. राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही जायला तयार नाही.

पुणे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘आयसीयू’ची व्यवस्था नाही. अशा वेळी खासगी हॉस्पिटलमधले आयसीयू विभागातील बेड शिल्लक राहिलेले नसताना अजित पवार यांचे पुण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

त्यामुळे पालकमंत्री अजित पवार तुम्ही भानावर या अशी टीका रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तत्काळ महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूचे विभाग सुरू करावेत आणि रुग्णांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करावा,

नाहीतर समस्त आजारी नागरिक रुग्णांना घेऊन महानगरपालिकांवरती मोर्चे काढू, असा संतप्त इशारा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.

चव्हाण म्हणाले की, आर्थिक संकट ओळखून मदत करावी ? लोकांना काही दिलासा देता येईल का? या संदर्भात पालकमंत्री झालेल्या अजित पवारांनी प्रयत्न करायचे सोडून दिलेले दिसते.