सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्यांनो, सावधान !

जातीय तणाव, धार्मिक दंगल घडेल किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यातून वाद, हाणामारी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

अशा प्रकारचे मोबाइल्सवर स्टेटस ठेवणारे अडचणीत येऊ शकतात. ऐतिहासिक पात्रांचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत.

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात असे २७ गुन्हे दाखल झाले आहेत. तरुण -तरुणींनी याचे भान ठेवण्याची गरज आहे; अन्यथा गंभीर गुन्हे दाखल होऊन करिअर बिघडण्याचा धोका आहे.

पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. मात्र, यात आता मोबाइल, सोशल मीडिया इंटरनेटचा समावेश झाला आहे.

मोबाइल सोडून तासभरही तरुण बाजूला राहू शकत नाहीत. दररोज वेगवेगळी स्टेटस लावून आपले फॉलोअर्स किती आहेत.

कितीजणांनी स्टेटस पाहिले ही उत्सुकता प्रत्येकालाच असते. यासाठी लोकांकडून वाहवा मिळवणारी स्टेटस शोधून ती लावली जातात. स्टेटस लावण्यात महिला व तरुणींचा पुढाकार असतो.

मात्र, काही तरुण जातीय भावनेतून प्रेरित होऊन वादग्रस्त स्टेटस लावत असतात. यातून दोन र समाजात वाद, धार्मिक भावना दुखावल्या जातील, याचा काहीच विचार केला जात नाही.

असे कृत्य करणाऱ्यांना समाजाकडून चोप तर मिळतो, शिवाय पोलिसांत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होत असतोकाही तरुण तर परिणामाची कल्पना असतानाही मुद्दाम असे कृत्य करतात.

व्यक्तिगत दुष्मनी काढण्यासाठी मानहानी होईल अथवा महिलांची बदनामी होईल, अशीही स्टेटस ठेवली जातात.

सोशल मीडियावरून अशा प्रकारे बदनामी करणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे हे हत्यार म्हणून वापरणाऱ्यांनी त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात, हे विसरू नये.

आयुष्य उद्ध्वस्त होते.

मोबाईल हे खेळणे नाही, स्टेटस, चॅटिंगमुळे वादावादीचे प्रकार होत असतात. त्या मुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू अशा प्रकारचे कृत्य कोणीही करू नये.

एकदा गुन्हा दाखल झाला, तर पासपोर्टसुद्धा मिळत नाही. शासकीय नोकरीलाही मुकावे लागते. यासाठी तरुण-तरुणींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

‘त्या’ ग्रुपपासून दूर राहा

धार्मिक भावना दुखावतील, अशा प्रकारचे मेसेज टाकून तरुणांना बिघडवणारे काही ग्रुप आहेत. अशा व्हॉट्सअॅप ग्रुपपासून प्रत्येकाने दूर राहावे.

अनोळखी व्यक्तीने ग्रुपमध्ये अँड केले, तर त्यातून तातडीने बाहेर पडावे, अशा ग्रुपवर मेसेज टाकणे, प्रतिक्रिया देऊ नये.

२७ गुन्हे ९३ आरोपी

कोल्हापूर जिल्ह्यात आक्षेपार्ह स्टेटस, पोस्टर, पुतळा विटंबना, जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे २०२२ मध्ये ७ गुन्हे दाखल होते.

सर्व उघड झाले. ९ आरोपी होते. तर २०२३ सालामध्ये २७ गुन्हे दाखल झाले. त्यातील २२ उघड होऊन ९३ संशयित आरोपी निष्पन्न झाले.